वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दीपके
दुघाळा ग्रामपंचायतीत सरपंच श्री. जगदीप वसंतराव दिपके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकारी यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
सन 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मताधिक्याने विजयी झाल्यानंतर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष असलेले श्री. दिपके यांनी गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात गावात अनेक विकासकामांचा धडाका लावला.
त्यात प्रमुखतः रस्ते, नाल्या, सांडपाणी व्यवस्थापन, शाळेची इमारत, सामाजिक सभागृह, शेतकऱ्यांसाठी विहिरींची उभारणी, वृक्षलागवड, गोठे, घरकुल योजना, तसेच तांडा-वस्ती सुधार योजना यांचा समावेश आहे. या योजनांमुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला गेला असून दुघाळा ग्रामपंचायतीने विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत.
गावातील सामाजिक सलोखा जपणे, तंटे मिटवणे आणि सर्व नागरिकांच्या अडचणीला तत्परतेने मदत करणे या बाबतीतही श्री. दिपके यांनी आदर्श कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली दुघाळा गावाला “आदर्श गाव” बनविण्याचा प्रयत्न यशस्वीपणे झाला आहे.
ग्रामसभेदरम्यान सरपंच श्री. दिपके यांनी गावातील सर्व नागरिक, युवक, महिला आणि शेतकरी यांना आवाहन केले की, “आपलं गाव — स्वच्छ, सुंदर, सर्व सोयीसुविधांनी संपन्न आणि इतर गावांसाठी आदर्श ठरेल असं बनवूया.”
ग्रामविकास अधिकारी जि.पी. हालबुर्गे, शाळेचे मुख्याध्यापक संजिव खिल्लारे, पंप ऑपरेटर शाम पवार, लाईनमन अमोल थोरात, कम्प्युटर ऑपरेटर बिस्मिल्ला बेग, ग्राम रोजगार सेवक विष्णु ढगे आणि ग्रामपंचायत सेवक दत्ता पोले यांचे कार्यकाळात मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व कर्मचाऱ्यांचा सरपंच श्री. दिपके यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
गावकऱ्यांनी सरपंच श्री. जगदीप वसंतराव दिपके यांच्या विकासकामाचे कौतुक करत, येत्या काळातही त्यांनी गावाच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली.


Post a Comment
0 Comments