वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दीपके
वाशीम :
आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे व सुभेदार रामजी सकपाळ यांच्या जयंती दिनी एट्रोसिटी पिडीत खून प्रकरणातील कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. संजय सिरसाठ यांनी जाहीर केला. या घोषणेनंतर वाशीम येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिठाई वाटप करत एनडिएमजेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एनडिएमजे) ही अनुसूचित जाती-जमातींसाठी कार्य करणारी अराजकीय सामाजिक संघटना असून अनुसूचित जातींच्या 59 व आदिवासींच्या 45 जमातींसाठी विधायक उपक्रम राबवले जातात. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये जातीय अत्याचारात खून झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी मिळावी यासाठी संघटनेचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून अहोरात्र लढा देत होते.
मंत्रालयातील अनेक स्तरांवर सतत पाठपुरावा करत, ऊन–पाऊस–थंडी आणि विविध संकटांचा सामना करत एनडिएमजेचे राज्य महासचिव एड. डॉ. केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते व एनडिएमजेच्या कार्यकर्त्यांनी शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. शेकडो मोर्चे, आंदोलने, पोस्ट कार्ड अभियान, प्रशिक्षण कार्यशाळा यांच्या माध्यमातून मोठी जनजागृती करण्यात आली.
हा संघर्ष दहा–पंधरा वर्षांचा. जातीय अत्याचारात पीडित कुटुंबीयांच्या वेदना, आईंच्या आर्त हाका, विधवांच्या तुटलेल्या स्वप्नांचा आक्रोश—या सर्वांचा आवाज म्हणजे एनडिएमजे.
पोलीस स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि मंत्रालयापर्यंत प्रत्येक पायरीवर वेदना आणि लढा. या संपूर्ण प्रवासात डॉ. केवल उके, वैभव गिते, पी.एस. खंदारे, शिवराम कांबळे, पंचशिला कुंभारकर, दिलीप आदमने, अजिनाथ राऊत, जगदिप दिपके आदींनी संघर्षाचे ओझे आपल्या खांद्यावर उचलले.
काही तरुणांना फक्त आंतरजातीय प्रेम केल्याच्या कारणावरून मृत्यू देण्यात आला. अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या सर्व अंधारातून पीडित कुटुंबांना पुन्हा उभं करण्याचा निर्धार एनडिएमजेने केला. महाराष्ट्रातील काही प्रकरणांत आधीच शासकीय नोकरी, जमीन आणि ५ हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात आली होती. मात्र ८८९ खून प्रकरणांसाठी ड वर्गातील शासकीय नोकरीची घोषणा हा मोठा टप्पा ठरला.
या निर्णयानंतर वाशीम येथे आयोजित आनंदोत्सवात एनडिएमजेचे राज्य सहसचिव पी.एस. खंदारे म्हणाले,
“हा निर्णय सहज मिळालेला नाही; रक्त, घाम आणि आक्रोशाच्या शाईनं लिहिलेला इतिहास आहे. खून प्रकरणातील पीडितांच्या घरात आता आशेचा उजेड झळकतोय. ही फक्त पुनर्वसनाची बातमी नाही, तर मातांच्या अश्रूंची परतफेड आहे; विधवांच्या तुटलेल्या स्वप्नांची पुन्हा बांधणी आहे.”
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राजू दारोकार, जिल्हाध्यक्ष समाधान सावंत, संघटक रामदास वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष दतराव वानखेडे, कोषाध्यक्ष महादेव कांबळे, अक्षय सरकटे, अर्जून सरकटे, निलेश सरकटे, किशोर सरकटे, गौतम सरकटे, बबलू सरकटे, जिल्हा सहसचिव नारायण सरकटे, रिसोड तालुका अध्यक्ष भिमराव खरात, तालुका संघटक बबन खरात आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments