वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
ठाणे जिल्हा प्रतिनिधी : मनोहर गायकवाड
कल्याण – राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्यातून होणाऱ्या मारहाणीच्या घटना वाढत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकारात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील तरुण विद्यार्थी अर्णव खैरे याने लोकलमधील मारहाणीच्या मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्णव हा मुलुंड येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घटना घडली त्यादिवशी तो नियमितप्रमाणे लोकलने प्रवास करत होता. प्रचंड गर्दीत चेंगरला जात असल्याने त्याने एका प्रवाशाला विनंती करत हिंदीत — “मेरे पे प्रेशर आ रहा है, आप थोडा आगे बढ़ो ना” — असे म्हटले. यावरून गर्दीतल्या काही तरुणांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवत मारहाण सुरू केली.
मारहाणी दरम्यान अर्णवने “मी सुद्धा मराठीच आहे” असे सांगूनही त्याची सुटका झाली नाही. “मराठीत बोलायला काय होतं? मराठीत बोलायला लाज वाटते का?” अशा दमदाटीसह त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनामुळे मानसिकरीत्या खचलेल्या अर्णवने फोनवरून सर्व घडलेले आपल्या कुटुंबीयांना सांगितले.
घरी पोहोचल्यानंतर तो शांत दिसत असला, तरी त्याच्या मनावर झालेला आघात खोलवर बसला होता. संध्याकाळी त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अर्णवचे वडील जितेंद्र खैरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, लोकलमधील मारहाण आणि त्यामुळे झालेल्या तीव्र मानसिक तणावामुळेच मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले. मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे भाषेच्या वादातून वाढणारी असहिष्णुता आणि सामाजिक तणाव या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.


Post a Comment
0 Comments