वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
*कार्यकारी संपादक : रितेश साबळे*
पुणे : पश्चिम हवेलीतील खडकवासला गावाजवळील ऐतिहासिक बौद्ध विहार पाडण्याच्या प्रकाराने बौद्ध समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, संबंधित सिंचन अधिकारी गिरीजा कल्याणीकर यांच्यावर त्वरित 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
इ.स. १९५८ साली भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष
*भय्यासाहेब आंबेडकर* यांनी खडकवासला परिसरातील ५६ गावांतील बौद्ध बांधवांना या ठिकाणी धम्मदीक्षा दिली होती. त्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. तथापि, दोन दिवसांपूर्वी या ऐतिहासिक स्थळावरील बौद्ध विहार सिंचन विभागाच्या अधिकारी गिरीजा कल्याणीकर यांनी पाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या निषेधार्थ सिंहगड रोड, पुणे येथील नांदेड सिटी पोलीस स्टेशनवर वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन केले. आरोपी अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनासमोर केली.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष मधुकर दुपारगुडे, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाच्या वेळी संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ऐतिहासिक वारशाचा अवमान केल्याचा आरोप केला.


Post a Comment
0 Comments