वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – मांडकी येथील चैतन्य कानिफनाथ मतिमंद आश्रम शाळेत मतिमंद विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने संस्थाचालक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे यांनी चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन सादर केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून मतिमंद मुलांवर शारीरिक व मानसिक अत्याचार झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून, हा प्रकार बाल हक्क कायदा आणि दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा (RPwD Act, 2016) यांचे उल्लंघन असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दोषी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर भा.दं.वि. कलम 323, 325 तसेच बाल न्याय कायदा कलम 75 अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, संबंधित शाळेची मान्यता रद्द करून पीडित विद्यार्थ्यांना मानसिक आधार व समुपदेशन सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी पक्षाकडून करण्यात आली.
या वेळी पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, युवा शहर कार्याध्यक्ष जहीर शेख, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे आणि जाकेर जे.के. उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments