Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संविधान दिन व समता रॅली उत्साहात साजरी.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️

सोशल मीडिया संपादक : मोहन दिपके

हिंगोली – भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर “संविधान अमृत महोत्सव – घर घर संविधान” या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हिंगोली येथे संविधान दिन व समता रॅलीचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.


सकाळी 8 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, तसेच विशेष अधिकारी अमोल घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ झाला.


सरजुदेवी कन्या विद्यालय आणि शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही रॅली आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहापर्यंत काढण्यात आली.


यानंतर संविधान दिन कार्यक्रम व संविधान कार्यशाळा जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. दीपप्रज्वलनानंतर मान्यवरांनी महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता होते. प्रमुख अतिथींमध्ये विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले. मान्यवरांचा सत्कार उद्देशिकेची प्रत व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. विद्यार्थिनींकडून संविधान गीताचे सादरीकरण आणि संविधान आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पठाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीमती वर्षा घुगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच बार्टी समतादूत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments