BMC Election Winner Prediction: यंदाच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या असतील असे अनेक तज्ज्ञमंडळींचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याबाबतची उत्सुकता आतापासूनच लागली आहे.
मुंबई:
मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील सगळ्या प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपरिषदांसह सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठीच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाहीत. मात्र या निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून या निवडणुका सगळ्या राजकीय पक्षांसाठी विधानसभा निवडणुकीइतक्याच महत्त्वाच्या बनल्या आहेत. निवडणुकांपूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून निवडणुकांची तारीख जाहीर होताच हे शाब्दीक हल्ले अधिक जोरदार होतील. यंदाच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या असतील असे अनेक तज्ज्ञमंडळींचे मत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय होणार याबाबतची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. एका ज्योतिषाने या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाकीत वर्तवले असून त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत यश मिळेल अथवा अपयश पदरात पडेल याबाबतही भाकीत वर्तवलं आहे.
ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी ठाकरे बंधूंबद्दलचे भाकीत वर्तवताना म्हटले आहे की, ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा निश्चितपणे फायदा होईल. मारटकर यांनी राज ठाकरेंबद्दल लिहिताना म्हटले आहे की, "राज ठाकरे यांची वृश्चिक लग्न मकर रास असून लग्नेश मंगळ व दशमेश रवी अष्टमात असल्यामुळे मूळ पक्षातून बाहेर पडावे लागले व नवीन पक्षाची स्थापना केली. दशमातील गुरू-प्लूटो योग व शनी-राहू योग रवीच्या दशमात असल्यामुळे मोठे यश मिळण्यात अपयश येत आहे. पक्षाला सुरुवातीला मिळालेले यश टिकवता आले नाही. मात्र सध्या मूळ शनीवरून होणारे शनीचे भ्रमण व रवीवरून होणारे गुरूचे भ्रमण लाभदायक असल्यामुळे महानगरपालिका निवडणुका उबाठा बरोबरच्या युतीमुळे पक्षाचे नगरसेवक निवडून येण्याची शक्यता राहील."
राज ठाकरेंना सोबत घेतल्याचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल ?
ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी ज्योतिष ज्ञान हा दिवाळी अंक प्रकाशित केला असून, यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रातील गुरू-शनी योगामुळे 2019 ते 2022 या काळात गोचर गुरू शनी योगामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. रवी-हर्षल युतीमुळे अर्धवट सत्ता मिळाली. कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच सत्ता सोडावी लागली आहे. सध्या चंद्र राशीच्या सप्तमातून ग्रहणे होत असून अष्टमातून शनीचे भ्रमण सुरू आहे. या योगामुळे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिका निवडणूकीत विशेष प्रभाव राहणार नाही. मनसेबरोबर युती केल्यामुळे काही प्रमाणात जागा टिकविण्यात यश मिळेल. मात्र सत्ता मिळविण्यात यश मिळणे कठीण राहील.


Post a Comment
0 Comments