वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) –
फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (Government Medical College and Hospital - GMCH) निवासी डॉक्टरांनी आज दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी कामबंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटना (MARD) तर्फे हे आंदोलन राबविण्यात येत असून, दिवसभर बाह्यरुग्ण विभाग (OPD) बंद ठेवण्यात आला आहे.
फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या आंदोलनाला राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला आहे.
या कामबंद आंदोलनामुळे रुग्णांना काही प्रमाणात गैरसोय झाली असली, तरी आपत्कालीन व आयसीयू सेवा मात्र सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली.
रुग्णसेवा व डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न आता गांभीर्याने घेतला पाहिजे, अशी भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या असून, रुग्णांना अडचण होऊ नये म्हणून काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टरांकडून तात्पुरती सेवा पुरवण्यात येत आहे.



Post a Comment
0 Comments