वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज✍️
सोशल मीडिया संपादक मोहन दिपके
कळमनुरी (जि. हिंगोली) :
कळमनुरी शहरातील सेठ नारायणदास सोमाणी चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नारायणा पब्लिक स्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या राजकीय आणि धार्मिक स्वरूपाच्या संघटनेमार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक व जातीवादी प्रशिक्षण देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन संबंधित शाळेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, दिनांक 28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 13 ते 23 वयोगटातील विद्यार्थ्यांना कोणतीही शासकीय परवानगी न घेता धार्मिक आणि जातीय विचारसरणीचे प्रशिक्षण देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाळेला भेट दिली असता, पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले आणि प्रशिक्षण सुरू असल्याचे उघड झाले.
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
संबंधित शाळेचा परवाना तत्काळ रद्द करावा.
शाळेत शैक्षणिक उपक्रमांव्यतिरिक्त धार्मिक किंवा राजकीय प्रशिक्षणास परवानगी नाही, त्यामुळे नियमभंग करणाऱ्या शाळा प्रशासनावर कारवाई व्हावी.
शाळा, संचालक, मुख्याध्यापक आणि प्रशिक्षण देणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.
प्रशिक्षणास शिक्षण विभाग किंवा पोलिसांची परवानगी होती का, याची सखोल चौकशी व्हावी.
बालहक्क संरक्षण कायदा, शिक्षणाचा अधिकार कायदा (RTE Act 2009), महाराष्ट्र शिक्षण अधिनियम आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याने संबंधितांवर गुन्हा नोंदवावा.
तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अलीकडेच कळमनुरी शहराचे नाव बदलून ‘कदंबनगरी’ या नावाने मोठी मिरवणूक काढल्याने हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकारामुळे शिक्षणाचा अधिकार कायदा, बालहक्क संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र खाजगी शाळा नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत, वंचित बहुजन आघाडीने 8 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा महासचिव ज्योतिपाल रणवीर, कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे, प्रवीण थोरात (जिल्हा सहसचिव), मोहम्मद अस्लम (युवा तालुका अध्यक्ष), यशवंत नरवाडे (ज्येष्ठ कार्यकर्ते), शकील पठाण (शहर अध्यक्ष), संतोष इंगोले (युवा तालुका महासचिव), जयभीम डोंगरे (युवा तालुका सचिव), प्रशांत चोपडे (संमेक वि.आ. ता.अ), दादाराव खंदारे, समाधान पाईकराव आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments