वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक मोहन दीपके
हिंगोली : सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने तहसील व पंचायत समिती स्तरावर विविध विशेष उपक्रम, शिबिरे व मोहिमा राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.
सुशासन सप्ताहादरम्यान तहसील व पंचायत समिती यांच्या माध्यमातून गावपातळीवर समाजातील विविध घटकांसाठी विशेष मोहिमा, कार्यक्रम, शिबिरे तसेच महसूल अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
कार्यक्रमांच्या वेळापत्रकानुसार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी नागरिकांच्या सनदेचे वाचन करून सुशासन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दि. 20 डिसेंबर रोजी सामाजिक सहाय्य योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष शिबिरे, पांदण, शेत व शिवार रस्ते मोकळे करणे, महसूल अभिलेख नोंदी, भटक्या व विमुक्त जातींसाठी जात प्रमाणपत्र व शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी शिबिरे, प्रलंबित वारस नोंदी निकाली काढण्याची मोहीम तसेच अकृषिक जमिनींची स्वतंत्र सातबारा मोहीम राबविण्यात येणार आहे.
दि. 21 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना, राष्ट्रीय कृषी योजना, सूक्ष्म सिंचन योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना तसेच मृदा आरोग्य योजनांसाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. दि. 22 डिसेंबर रोजी ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिबिरे घेण्यात येतील.
दि. 23 डिसेंबर रोजी शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना व अटल बांधकाम योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. दि. 25 डिसेंबर रोजी दहावीनंतरच्या शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार पीडित अर्थसहाय्य योजना, डॉ. बाबासाहेब स्वाधार योजना तसेच मागासवर्गीय मुला-मुलींसाठीच्या विविध शासकीय योजनांसाठी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत.
याशिवाय सुशासन सप्ताहाच्या कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कार्डधारक व नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, कार्यालयांशी संबंधित प्रलंबित अर्ज व तक्रारी निकाली काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
सुशासन सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमांची फोटोसह माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक असून, दररोजचा प्रगती अहवाल सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रकल्प अधिकारी उमाकांत मोकरे यांच्याकडे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. या अहवालात विशेष शिबिरांतर्गत व सीपीजीआरएमएस तसेच राज्य पोर्टलवरील निकाली काढलेल्या तक्रारींची संख्या, ऑनलाईन सेवा वितरणाशी जोडलेल्या सेवा व अर्जांची माहिती, सुशासन पद्धतींचा प्रसार व यशोगाथांचा समावेश करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


Post a Comment
0 Comments