वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
मुरबाड तालुक्यातील माता नगर परिसरातील अनेक रेशन धारकांना गेल्या दोन महिन्यांपासून रेशन मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या अन्यायाविरोधात आज माता नगरातील नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्याकडे निवेदन देत आपल्या हक्काच्या रेशनची मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माता नगर नागाचा खडक येथील रेशन दुकान पूर्वी नागाचा खडक परिसरात होते. मात्र सदर रेशन दुकानाचे स्थलांतर करून देवीच्या आळी येथे करण्यात आले. स्थलांतरानंतरही अनेक शिधापत्रिका धारकांना नियमित रेशन मिळत नसून काही धारकांना पूर्णपणे रेशनपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
या प्रकारामुळे गरीब व गरजू कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका सौ. रवीना विनायकराव उपस्थित होत्या. पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित कार्डधारकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र लाभार्थ्यांना तात्काळ रेशन मिळेल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, “आम्हाला आमचे हक्काचे रेशन वेळेवर मिळावे,” अशी ठाम मागणी नागरिकांनी तहसीलदारांकडे केली असून, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


Post a Comment
0 Comments