Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी – जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

मोहन दिपके 

जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील काही गावांमध्ये मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून भूगर्भातून आवाज येत असल्याचे निदर्शनास आले आहे. आज मंगळवार (दि. 30) रोजी सकाळी 5.55 वाजता पुन्हा एकदा सौम्य धक्का व भूगर्भीय आवाज जाणवला असून याची नोंद भारतीय हवामान विभागाच्या भूकंप मापक केंद्रात 3.5 रिक्टर स्केल इतकी करण्यात आली आहे.

सन 1993 मध्ये किल्लारी (लातूर) येथे झालेल्या भूकंपात घरांच्या पत्र्याच्या छतांवर ठेवलेल्या दगडांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती, याची दखल घेता खबरदारीचा उपाय म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सर्व गावांतील नागरिकांनी विशेषतः ज्यांच्या घरांची छते पत्र्याची असून त्यावर दगड ठेवलेले आहेत, अशा नागरिकांनी हे दगड तात्काळ काढून घ्यावेत तसेच पत्र्याला तारेच्या सहाय्याने योग्य आधार द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

भूकंप आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भूकंपापूर्वी इमारतींचे बांधकाम भूकंपरोधक निकषांनुसार असावे. घराच्या छताला अथवा पायाला भेगा असल्यास त्वरित दुरुस्ती करावी. पाण्याची बाटली, कोरडे अन्नपदार्थ, प्रथमोपचार साहित्य, बॅटरी, मेणबत्ती, आगपेटी, चाकू, पाणी शुद्धीकरणाची साधने, जीवनावश्यक औषधे, रोख रक्कम, रेडिओ, शिट्टी इत्यादी वस्तू सहज वाहून नेता येतील अशा पिशवीत नेहमी तयार ठेवाव्यात. घरातील फळ्या, कपाटे भिंतीला घट्ट बसवावीत व जड वस्तू खालच्या बाजूस ठेवाव्यात. काचेच्या व फुटणाऱ्या वस्तू बंद कपाटात ठेवाव्यात. गॅस, वीज व पाण्याच्या जोडण्या सुरक्षितपणे जखडून ठेवाव्यात.

भूकंपादरम्यान इमारतीत असाल तर शक्य असल्यास मोकळ्या जागेकडे जावे अथवा टेबलाखाली, मजबूत खांबाजवळ, दरवाजाच्या चौकटीत आसरा घ्यावा. लिफ्टचा वापर करू नये. रस्त्यावर असाल तर उंच इमारती, भिंती व विजेच्या तारांपासून दूर मोकळ्या जागेत थांबावे. वाहन चालवत असाल तर सुरक्षित ठिकाणी वाहन थांबवावे.

भूकंपानंतर रेडिओ किंवा टी.व्ही.वरून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. पाणी, गॅस व वीज कनेक्शन बंद ठेवावेत. धूम्रपान टाळावे. विजेच्या तारा हाताळू नयेत. नुकसान झालेल्या इमारतींचा वापर करू नये तसेच रस्ते मोकळे ठेवून मदत कार्यासाठी सहकार्य करावे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments