Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बीडमध्ये भरदिवसा तरुणीचे फिल्मी शैलीत अपहरण; महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक रितेश साबळे

बीड : शहरातील अत्यंत वर्दळीच्या पंचायत समिती चौकात गुरुवारी (दि. १८ डिसेंबर) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तरुणीचे भररस्त्यात अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी तरुणीला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये कोंबून पळ काढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी कॉलेजचे काम आटोपून पंचायत समिती परिसरातून शास्त्री चौकाच्या दिशेने पायी जात होती. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या दोन तरुणांनी अल्टो कारने तिचा रस्ता अडवला. काही कळण्याच्या आतच आरोपींनी तरुणीला उचलून कारमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. तरुणीने जीव वाचवण्यासाठी जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केली; मात्र आरोपींनी तिच्यावर मारहाण करत तिला जबरदस्तीने गाडीत ढकलले.


ही घटना घडत असताना आसपासच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. काही नागरिकांनी धाडस दाखवत कार अडवण्याचा प्रयत्नही केला; मात्र आरोपींनी कोणालाही न जुमानता वाहन वेगात शास्त्री चौकातून राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने, शहागड मार्गे पळवून नेले.


घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयित अल्टो कारच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. शहागड व परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून विशेष पथके तपासात गुंतली आहेत. लवकरच आरोपींना अटक करून तरुणीची सुटका केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या अशा प्रकारे तरुणीचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “वर्दळीच्या ठिकाणी जर मुली सुरक्षित नसतील, तर सुरक्षितता नेमकी कुठे?” असा सवाल उपस्थित होत असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


या घटनेमुळे बीड शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे पुढे आला असून, कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



Tags

Post a Comment

0 Comments