वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर | दि. १७ डिसेंबर २०२५ :पंतप्रधान आवास योजना (PMAY) अंतर्गत घरकुलासाठी ऑनलाइन अर्ज करताना डोमिसाईल (अधिवास) प्रमाणपत्राची अट अनेक गरजू नागरिकांसाठी अडथळा ठरत असल्याने, त्याऐवजी तहसीलदारांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख दिनेश गवळे यांनी यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या PMAY साठी डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट व वेळखाऊ असून, अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे पात्र लाभार्थी अर्ज प्रक्रियेतून वंचित राहतात. विशेषतः ज्या नागरिकांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मस्थळाची नोंद नाही, अशा लाभार्थ्यांना डोमिसाईल मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, सामान्य व गरजू नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणणे आवश्यक असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने म्हटले आहे. डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी लागणारा विलंब टाळण्यासाठी तहसीलदारांकडून दिलेले रहिवासी प्रमाणपत्र अर्जासाठी स्वीकारण्यात यावे, अशी ठाम भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.
हे निवेदन देताना पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, जिल्हा कार्याध्यक्ष जयनाथ बोर्डे, ज्येष्ठ नेते प्रकाश घोरपडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतल्यास, शहरातील हजारो बेघर व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments