वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर : जटवाडा रस्त्यालगत असलेल्या ओव्हरगावमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या शेतजमिनीच्या ताब्यावरून झालेल्या वादातून माजी सरपंच दादा साहू पठाण यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी सुमारे १०–११ जणांच्या टोळीने पठाण कुटुंबावर लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्यांनी अमानुष हल्ला केला. या थरारक घटनेत दादा पठाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन्ही मुलांना गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेच्या वेळी पठाण कुटुंबातील महिलांनी हात जोडून हल्लेखोरांना थांबवण्याची आर्जवे केली, वाद मिटवण्याची विनंती केली; मात्र संतापलेल्या टोळीने हल्ला थांबवला नाही. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील दृश्यांमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
*जागेच्या वादातून हत्या*
पठाण कुटुंब मूळचे ओव्हरगावचे आहे. त्यांच्या घराजवळील शाळेच्या परिसरात शेतजमीन असून त्या जमिनीला लागून एक छोटी वाट आहे. या वाटेवरून सुरुवातीला किरकोळ वाद झाले; पुढे आरोपी टोळीने संपूर्ण जमिनीवरच हक्क सांगण्यास सुरुवात केली. यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. बुधवारी सकाळी दादा पठाण यांनी जमीन सपाट करण्यासाठी जेसीबी मशीन बोलावले. त्याच वेळी १०–११ जणांची टोळी घटनास्थळी आली आणि थेट हल्ला चढवला. उपचारांची संधी मिळण्याआधीच दादा पठाण यांचा मृत्यू झाला.
*पोलिस कारवाई*
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून रात्रीपर्यंत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित दहा आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांकडून कठोर कारवाई आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी होत आहे.
*आरोपींची नावे*
इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान, अस्लम गयाज पठाण (उर्फ गुड्डू), हैदर खान गयाज खान पठाण, समीर जमीर पठाण, उमेर जमीर पठाण, फुरकान अजगर पठाण, मोईन इनायत खान पठाण.


Post a Comment
0 Comments