Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*सेनगाव येथील अवैध तंबाखू विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही*

  


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज 

मोहन दिपके 

 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार अधिष्ठाता चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सेनगाव शहरात अवैध तंबाखू विक्री करणाऱ्या पान टपऱ्यांवर आज दि. 9 डिसेंबर 2025 रोजी धडक कार्यवाही करण्यात आली.

हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत सेनगाव शहरातील एकूण 10 अवैध तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असून एकूण 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. किरण राजाभाऊ लोंढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यावेळी कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ), आनंद साळवे (सोशल वर्कर), मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. खंदारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल के. एम. थिटे तसेच पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे आरोग्यविषयक दुष्परिणाम लक्षात घेता जिल्हाभरात अशीच तपासणी व दंडात्मक कार्यवाहीची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. 

कोटपा कायदा-2003 नुसार कलम 4 अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, कलम 5 अन्वये तंबाखूयुक्त कोणत्याही पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीस बंदी, कलम 6 (अ) नुसार 18 वर्षांखालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थांची विक्री करणे किंवा त्यांच्याकडून विक्री करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. कलम 6 (ब) नुसार शैक्षणिक संस्थांच्या चारही बाजूंनी 100 मीटरच्या परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्रीस बंदी आहे. तर कलम 7, 8, 9 नुसार तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेटवर 85 टक्के भागावर चित्रात्मक व लिखित वैधानिक इशारा स्पष्टपणे छापलेला असणे बंधनकारक आहे.



Post a Comment

0 Comments