वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
शंकर गायकवाड
नांदगाव फाटा ते नांदगाव गावापर्यंतचा रस्ता गेल्या एक वर्षापासून अतिशय दयनीय अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे प्रवासी, वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रवाशांच्या सततच्या तक्रारीनंतर लातूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले होते. मात्र अवघ्या पंधरा दिवसांतच रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. तात्पुरत्या दुरुस्तीमुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच वाढताना दिसत आहे.
पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. खड्ड्यांत पाणी साचल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शाळकरी विद्यार्थी, कामगार, रुग्ण व ज्येष्ठ नागरिक यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, नांदगाव फाटा ते नांदगाव रस्ता तात्काळ व कायमस्वरूपी पद्धतीने दुरुस्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दर्जेदार रस्त्याचे काम करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.


Post a Comment
0 Comments