वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
बाळकृष्ण सोनावणे
शहापूर तालुका व मुरबाड तालुक्याला जोडणाऱ्या गुंडे ते कांबागाव या महत्त्वाच्या सार्वजनिक रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. पाचघर डेहणे फाटा ते गुंडे गाव या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
शहापूर तालुक्यापासून सुमारे ४० ते ५० किलोमीटर अंतरावर असलेला हा दुर्गम भाग असून ये-जा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. परिणामी या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे.
या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे अवघड झाले आहे, तसेच वयोवृद्ध नागरिक, महिला व सर्वसामान्य जनतेला दवाखाना, बाजारहाटीसाठी डोळखांब बाजारपेठेत जाण्यास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्री-अपरात्री एखादा गंभीर रुग्ण डोळखांब किंवा शहापूर येथील दवाखान्यात घेऊन जाताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या दुर्गम भागाकडे लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करावी व त्वरित दुरुस्ती करावी, अशी ठाम व रास्त मागणी गुंडे, कांबागाव व परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments