किन्हवली प्रतिनिधी: बाळकृष्ण सोनवणे
उंभ्रई (ता. शहापूर):३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ग्रामपंचायत उंभ्रई येथे शासनाच्या जी.आर.नुसार घरपट्टी थकीत धारकांना ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
आज पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय जाहीर झाल्यानंतर, ग्रामपंचायत शिपाई यांनी गावात दवंडी देऊन नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर थकीत घरपट्टी धारकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपली थकीत घरपट्टी ग्रामसेविका सौ. रीना राऊत मॅडम यांच्याकडे जमा केली.
या उपक्रमामुळे गावातील अनेक नागरिक जागृत झाले असून, शासनाच्या या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांची गर्दी होत आहे. थकीत कर भरण्यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होऊन शासनाच्या कामकाजाला हातभार लागत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या यशस्वी उपक्रमासाठी सरपंच श्री. विलास चौधरी, ग्रामसेविका सौ. रीना राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. संतोष चौधरी तसेच ग्रामपंचायत शिपाई श्री. बाळकृष्ण रोकडे यांचे मोलाचे योगदान लाभले.
ग्रामसभा संपल्यानंतर लगेचच गावातील दक्ष नागरिक श्री. अशोक चौधरी, श्री. गोविंद चौधरी, श्री. बाळकृष्ण सोनवणे, श्री. संतोष हुमणे तसेच इतर अनेक नागरिकांनी या सवलत योजनेचा लाभ घेत आपली थकीत घरपट्टी भरली.


Post a Comment
0 Comments