Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*प्लीज सोडा… मारू नका त्यांना’; महिलेच्या आर्त किंकाळ्या, तरीही ११ जणांच्या टोळक्याने माजी सरपंचाची निर्घृण हत्या*

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

सहकार्यकारी संपादक - मनोहर गायकवाड

छत्रपती संभाजीनगर -“सोडा… मारू नका त्यांना” अशी आर्त विनवणी करत घरातील महिला हल्लेखोरांच्या हाता-पाया पडत होत्या. मात्र सत्तेची आणि गुंडगिरीची नशा डोक्यात गेलेल्या टोळक्याने कोणतीही दया न दाखवता माजी सरपंचाची हत्या केली. “कायदा आमच्या हातात आहे” अशी वल्गना करत ११ जणांच्या टोळक्याने ओहर गावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (वय ६८) यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७) दुपारी जटवाडा रोडवरील ओहर गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.


दादा पठाण आणि आरोपी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचा वाद सुरू होता. बुधवारी दुपारी दादा पठाण हे घरासमोर बसलेले असताना ११ जणांचे टोळके लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या घेऊन तेथे आले. त्यांनी अचानक पठाण यांच्यावर हल्ला चढवला. 


हल्ला सुरू होताच पठाण यांच्या घरातील महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्या अक्षरशः हल्लेखोरांसमोर हात जोडून विनवण्या करत होत्या, “प्लीज सोडा… मारू नका त्यांना, आपण बसून चर्चा करू.” मात्र रक्ताची तहान लागलेल्या हल्लेखोरांनी कोणतेही ऐकून न घेता वृद्ध दादा पठाण यांच्या डोक्यावर व शरीरावर सपासप वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. वाचवण्यासाठी आलेली त्यांची दोन मुलेही या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहेत.


प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर अत्यंत आक्रमक होते. हल्ला करताना ते “कायदा आमच्या हातात आहे, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशा धमक्या देत होते. दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी पठाण यांच्या घरासमोरील दुकानाचीही तोडफोड केली.


ओहर गावातील शाळेच्या बाजूला असलेल्या साडेचार एकर जमिनीवरून हा वाद सुरू होता. ही जमीन दादा पठाण यांच्या मालकीची असून महसूल दप्तरी तशी नोंद आहे. मात्र आरोपी इम्रान खान, मोईन खान व त्यांच्या साथीदारांचा या जमिनीवर डोळा होता. यापूर्वीही त्यांनी पठाण कुटुंबाला धमकावले होते.


घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हर्सूल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी इम्रान खान, मोईन खान पठाण आणि उमेर जमीर पठाण या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.



Post a Comment

0 Comments