वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सोशल मीडिया संपादक- मोहन दिपके
जिल्ह्यात एकही बालविवाह घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, बालविवाह प्रतिबंधासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बालविवाह निर्मूलनाचा ठाम निर्धार व्यक्त करत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली विवाहसेवा पुरवठादारांची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बालविवाहाची सद्यस्थिती, त्यामागील कारणे व होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील तरतुदी स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शाळेचे अभिलेख, मॅट्रिक किंवा समतुल्य प्रमाणपत्र, जन्म दाखला आदी दस्तऐवजांच्या आधारे वयाची पडताळणी करणे अनिवार्य असून, कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नसल्यास प्रकरण बालकल्याण समितीकडे पाठविणे बंधनकारक आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विवाहसेवा पुरवठादारांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, बालविवाह होत असल्याचे आढळल्यास कोणतीही सेवा देण्यास नकार द्यावा व तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर तक्रार करावी. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवण्यात येते तसेच 8545088545 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारेही तक्रार नोंदविता येते. प्रत्येक मंगल कार्यालयात नोंदणी रजिस्टर ठेवून प्रत्येक विवाहाची नोंद करणे, शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यप्रत, स्वाक्षरी व शाळेचा शिक्का तपासणे तसेच बालविवाह प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या गावात बालविवाह घडेल, त्या गावाला शासनाचा कोणताही निधी दिला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस एकूण 45 विवाहसेवा पुरवठादार उपस्थित होते. यामध्ये मंगल कार्यालय व्यवस्थापक, प्रिंटिंग प्रेस संघटनेचे अध्यक्ष, फोटोग्राफर, केटरर्स, मंडप डेकोरेटर, विविध धर्मांचे धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष व सदस्य तसेच सर्व धर्मांचे धर्मगुरू सहभागी झाले होते.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व सेवा पुरवठादारांनी “बालविवाहास कोणतीही सेवा पुरविणार नाही” असा सामूहिक संकल्प केला. तसेच नवीन वर्षाच्या शुभदिनी हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
बैठकीस उपस्थित सर्व सेवा पुरवठादारांचे आभार सदस्य सचिव, बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दल तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांनी मानले. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, राजरत्न पाईकराव, SBC3 चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अनिरुद्ध घनसावंत, हिंगोली चाईल्ड हेल्पलाईन 1098 चे अंकुर पाटोडे, विकास लोणकर, सुरज इंगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments