वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे जिल्हा संपादक - शंकर गायकवाड
भीमा कोरेगाव : "५०० महार शूरवीरांनी पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याशी दिलेला लढा आजही आपल्याला प्रेरणा देतो. आज आपण प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असली तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 'शासनकर्ती जमात' बनण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी आता आंबेडकरी चळवळ खांद्यावर घेऊन सत्ताधारी बना," असे रोखठोक आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
शौर्य दिनानिमित्त १ जानेवारी २०२६ रोजी विजयस्तंभ परिसरात आयोजित भव्य जाहीर सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
शौर्याचा वारसा आणि भविष्यातील संकल्प
सभेत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, ५०० शूरवीरांचा संघर्ष हा केवळ इतिहास नसून ती आपली ताकद आहे. "आज आपण शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि मीडिया अशा सर्वच क्षेत्रांत ठसा उमटवला आहे.
मात्र, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण सत्तेच्या चाव्या हाती घेत नाही, तोपर्यंत ही प्रगती अपूर्णच राहील. तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे," असे त्यांनी उपस्थितांना ठणकावून सांगितले.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायाला चार प्रमुख संकल्प दिले:
१) मी आंबेडकरवादी चळवळ माझ्या खांद्यावर घेईन.
२) मी संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करून न्यायासाठी लढेल.
३) मी आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना सत्तेत बसवेल.
४) मी सत्ताधारी बनेल.
येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा संदर्भ देत सुजात आंबेडकर म्हणाले, "या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून निवडून येणारा उमेदवार हा केवळ नावाने नाही, तर विचाराने आंबेडकरवादी असावा. संविधानाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या हातांनाच बळ द्या."
विजयस्तंभ परिसरात जनसागराची उपस्थिती.
दुपारी १ वाजता सुरू झालेल्या या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो अनुयायांची उपस्थिती होती. 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण भीमा कोरेगाव परिसर दुमदुमून गेला होता. सभेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयस्तंभ परिसरात प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Post a Comment
0 Comments