वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
उल्हासनगर-शंकर गायकवाड
उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला भाजपने स्वबळावर लढत घाम फोडला. अनेक प्रभागात शिवसेना आणि भाजपात कडवी लढत झाली. शिवसेना आघाडी आणि भाजपला प्रत्येकी ३७ जागा मिळाल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडी दोन, काँग्रेस एक आणि अपक्षाचा एका जागेवर विजय झाला आहे. त्यामुळे सत्तेचे त्रांगडे तयार झाले आहे. एक अपक्ष कलानी समर्थक असल्याने त्यांचा शिवसेना आघाडीला पाठिंबा मिळू शकतो. मात्र काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा कुणाला मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत दुफळीचा पाच ते सहा जागांवर फटका बसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. शेवटच्या क्षणापर्यंत शहरात सत्तेचे चित्र मात्र अस्पष्ट आहे.
वंचित बहुजन आघाडीने आश्चर्यकारक रित्या उल्हासनगर महापालिकेत प्रभाग १८ मध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे. प्रभाग १८ मधील 'अ' जागेवर काँग्रेसच्या अंजली साळवे तर 'ड' जागेवर भाजपचे राजेश वानखेडे यांचा विजय झाला. तर 'ब' जागेवर वंचितच्या सुरेखा सोनवणे आणि 'क' जागेवर विकास खरात यांचा विजय झाला. या विजयामुळे वंचित बहुजन आघाडीने महापालिकेत प्रवेश केला आहे. येथे पिपल्स रिपब्लिकन आघाडीचा पराभव झाला. त्यांना शिवसेना आघाडीने पाठिंबा दिला होता. आता वंचित, काँग्रेस निर्णायक भूमिकेत आहेत.
गेल्या काही निवडणुकांमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत राहणाऱ्या आणि सत्तेची गणिते बदलणाऱ्या साई पक्षाला या अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर आशा इदनानी यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला.


Post a Comment
0 Comments