वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
(प्रतिनिधी : मोहन दिपके)
फलटण : देशभरात भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, फलटण तालुक्यात मात्र या राष्ट्रीय उपक्रमाकडे प्रशासन आणि राजकीय यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन निर्णय आणि जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये तसेच लोकप्रतिनिधी संविधान जनजागृतीऐवजी राजकीय चर्चांमध्येच अडकले असल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस (NDMJ) या संघटनेचे फलटण तालुका सचिव जय भैया माने यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रशासन संविधानाऐवजी नेत्यांच्या दौऱ्यात गुंतले
संविधान अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम, चर्चा, वाचन उपक्रम राबवणे अपेक्षित होते. मात्र ग्रामपंचायत स्तरापासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण संविधान प्रचाराऐवजी राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांत आणि कार्यक्रमांत अधिक सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असूनही कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रभावी उपक्रम न राबवल्याने लोकशाही मूल्यांबाबतची उदासीनता ठळकपणे समोर आली आहे.
निवडणुकींच्या तयारीत नेत्यांना संविधान विसर
येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते पक्षबांधणी, गटबाजी आणि फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहेत. ज्या संविधानामुळे लोकशाही, समता, बंधुता आणि मतदानाचा अधिकार मिळाला, त्याच संविधानाच्या जनजागृतीसाठी नेत्यांकडे वेळ नसल्याची टीका जय भैया माने यांनी केली.
जय भैया माने यांचे स्पष्ट आवाहन
“नागरिकांनी आता स्वतः जागृत होणे गरजेचे आहे. प्रशासकीय अधिकारी किंवा राजकीय नेते तुमचे संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार सांगायला येणार नाहीत. ते केवळ त्यांच्या पक्षवाढीचे आणि सत्तेचे गणित तुमच्यावर लादतील. संविधानाबाबतची जनजागृती न होणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तालुक्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये वैयक्तिक पुढाकारातून संविधान अमृत महोत्सव साजरा होत असला, तरी व्यापक पातळीवर शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. आता वरिष्ठ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments