प्रतिनिधी : शंकर गायकवाड
शहापूर तालुक्यातील टाकीपठार येथील जिल्हा परिषद आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शहाड येथील सेंच्युरी रेयॉन हायस्कूल येथे दोन दिवसांच्या कालावधीत उत्साहात पार पडली.
या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल ८५ शाळांमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विविध नाविन्यपूर्ण वैज्ञानिक संकल्पना, प्रयोग व मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामध्ये टाकीपठार आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने व अभ्यासपूर्ण मांडणीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेत तृतीय क्रमांकाचे मानांकन मिळवले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख सर तसेच सर्व शिक्षकवृंदांचे विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने घेतलेले परिश्रम, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि शैक्षणिक वातावरण यामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे टाकीपठार व परिसरातील पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी शाळेच्या शिक्षकवृंदाचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून भविष्यातही विद्यार्थी आणखी मोठी यशस्वी कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे .


Post a Comment
0 Comments