परभणी | प्रतिनिधी- शंकर गायकवाड
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हमदापूर गावात जातीय द्वेषातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसह तिच्या कुटुंबावर अमानुष हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी दिशा रमेश गायकवाड हिच्यावर आरोपींनी हाताने ओढत मारहाण केली. तसेच तिचे वडील, आई, भाऊ, काका व आजोबा यांच्यावरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून नाक फुटणे, चेहऱ्यावर सूज येणे व रक्तस्राव झाला आहे. आईच्या डोक्यालाही गंभीर जखमा झाल्या असून रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.
पीडित कुटुंबीयांना गंभीर अवस्थेत परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींनी जातीय शिवीगाळ करत सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष प्रमोद (भाऊ) कुटे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पीडित कुटुंबाला तात्काळ संरक्षण द्यावे, उपचारासाठी विशेष परवानगी द्यावी तसेच आरोपींवर कठोर कारवाई करून गावबंदी व हद्दपारीचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे गावात जातीय तेढ निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.




Post a Comment
0 Comments