Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

खाकीवर डाग? कर्नाटकच्या डीजीपींचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल; कार्यालयातच महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्याचा आरोप

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मनोहर गायकवाड

बेंगळुरू : कर्नाटक पोलीस दलाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याबाबत एक धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब समोर आली आहे. डीजीपी दर्जाचे अधिकारी डॉ. रामचंद्र राव यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, या व्हिडिओत ते पोलीस गणवेशात, अधिकृत कार्यालयातच एका महिलेसोबत अश्लील वर्तन करताना दिसत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये रामचंद्र राव हे कार्यालयीन खुर्चीवर बसलेले असून त्यांच्या शेजारी एक महिला दिसते. काही क्षणांतच ते तिला मिठी मारताना व आक्षेपार्ह हालचाली करताना दिसत असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या महिला दिसत असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. हा व्हिडिओ गुप्तपणे चित्रीत करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना डीजीपी रामचंद्र राव यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. “हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून तंत्रज्ञानाचा वापर करून मोर्फ करण्यात आला आहे. मला बदनाम करण्यासाठीच हा प्रकार घडवण्यात आला असून, यामागे मोठे षडयंत्र आहे,” असा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात आपण कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंब करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलीस गणवेशात आणि शासकीय कार्यालयात असा प्रकार घडल्याचा आरोप अतिशय गंभीर असल्याने संबंधित विभागाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे.


उल्लेखनीय बाब म्हणजे, रामचंद्र राव हे याआधीही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ते अभिनेत्री तसेच गोल्ड स्मगलिंग प्रकरणातील आरोपी रान्या राव यांचे सावत्र वडील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला अधिकच राजकीय आणि सामाजिक वळण मिळाले आहे.


सध्या व्हायरल व्हिडिओची तांत्रिक तपासणी आणि सत्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असून, चौकशीनंतरच संपूर्ण सत्य समोर येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments