Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

हिंगोली–नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा कारवाईचा धडाका ७३ लाख रुपयांच्या गुटख्यासह एकूण १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त





वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मोहन दीपके

नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांविरोधात पोलिस उपमहानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक आणि प्रभावी कारवाई राबविण्यात आली. या संयुक्त कारवाईत तब्बल ७३ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे.



नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षकांनी त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना एकत्र करून विशेष पथकांची निर्मिती केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पथकातील अधिकाऱ्यांनी हिंगोली व नांदेड शहरात एकाच वेळी छापे टाकून ही धडक कारवाई केली.

हिंगोली जिल्ह्यात मोठी कारवाई

हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत तीन चारचाकी वाहनांमधून १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याच प्रकरणात आणखी एका चारचाकी वाहनातून १० लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध अन्नसुरक्षा कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.



नांदेड शहरात गोदामावर छापा

नांदेड शहरातील इतवारा भागात साठवून ठेवलेल्या गुटख्यावर पोलिस पथकाने छापा टाकला. या कारवाईत ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा आणि २० लाख ५० हजार रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ७८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एकूण जप्ती १ कोटी ३ लाखांवर

हिंगोली व नांदेड येथील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये एकूण ७२ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा, तीन चारचाकी वाहने तसेच एक ट्रक असा सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई अवैध गुटखा व्यवसायावर मोठा आघात मानली जात असून, पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


Post a Comment

0 Comments