प्रतिनिधी- शंकर गायकवाड
लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या कु. अनुष्का हिच्या अमानुष हत्या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी समस्त मातंग समाजाच्या वतीने वाशी येथील तहसील कार्यालयावर अभूतपूर्व मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. घरातील माता-भगिनी, आबालवृद्ध, तरुण युवक-युवती यांनी केवळ सामाजिक जाणीवेतून आपल्या दैनंदिन कामांना बाजूला ठेवत वाशी शहरातील प्रमुख चौकांतून शांततेत मोर्चा काढला आणि तहसील कार्यालयात एकत्र जमून शासनाकडे न्यायाची ठाम मागणी केली.
या मोर्चातून समाजाची एकी, जागरूकता आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी स्पष्टपणे दिसून आली. निरपराध अनुष्काला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
काही जण मातंग समाजाला झोपलेला, अस्मिताहीन समाज म्हणून हिणवतात; मात्र या अभूतपूर्व मोर्चाने अशा सर्व आरोपांना खोटे ठरवले आहे. अन्याय व अत्याचाराच्या विरोधात मातंग समाज आज खंबीरपणे उभा आहे आणि भविष्यातही तितक्याच ठामपणे उभा राहील, याबाबत कोणतीही शंका नाही.
या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला माता-भगिनी समाज बांधवांनी खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. विशेष म्हणजे वाशी शहरातील व्यापारी वर्गानेही आपली दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच या मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकार बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments