Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद रस्ते योजनेचा लाभ घ्यावा.

 


वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

प्रतिनिधी : मोहन दीपके

शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद रस्ते योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतरस्ते व पाणंद रस्ते यंत्रसामग्रीच्या सहाय्याने पक्के, बारमाही व १५ फूट रुंदीचे करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे शेतमाल वाहतूक सुलभ होणार असून शेतातील अतिक्रमणांचे प्रश्नही मार्गी लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जनता दरबार कार्यक्रमात केले.


हिंगोली तालुक्यातील वैजापूर, अठ्ठरवाडी, जांभरुण (आंध), जांभरुण तांडा व पहेनी या गावांमध्ये आयोजित जनता दरबार व मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी योगेशकुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) संजय कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, शिक्षणाधिकारी (मा.) संदीपकुमार सोनटक्के, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, वनसंरक्षक मिनाक्षी पवार यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून फार्मर आयडी तातडीने तयार करून घ्यावी. शेतीसंबंधी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक असून सर्व लाभ थेट डीबीटीद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. तसेच रेशन धान्यासाठी ई-केवायसी, अतिवृष्टी व विविध योजनांचे अनुदान मिळण्यासाठीही ई-केवायसी पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.


यावेळी मागेल त्याला सौर पंप, जलजीवन मिशन, पाणंद रस्ते, जलतारा, बचत गट लखपती दीदी, विविध योजनांची बँक कर्ज प्रकरणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. संबंधित गावांतील नागरिकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेऊन निवेदने स्वीकारण्यात आली व त्या त्वरित निकाली काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अठ्ठरवाडी व जांभरुण (आंध) येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली. गणित, मराठी व इंग्रजी विषयातील अध्ययनाचा आढावा घेतला. तसेच जांभरुण (आंध) तांडा येथील संत नामदेव निवासी आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता व निवास व्यवस्थेची माहिती घेतली. याशिवाय पुसेगाव येथील सर्वज्ञतीर्थ भगवान बाहुबली यांच्या सर्वात उंच पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. जांभरुण तांडा येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रास भेट देऊन तेथील कामकाज, अभिलेखे व आरोग्य सुविधांची तपासणी करण्यात आली. तसेच अठ्ठरवाडी ते जांभरुण (आंध) या गावांना जोडणाऱ्या कठीण पाणंद रस्त्याची तहसीलदारांच्या वाहनातून प्रत्यक्ष पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

वरील सर्व गावांमध्ये आयोजित जनता दरबार कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments