वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
लातूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर पद अनुसूचित जाती (एस.सी.) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असून, त्यामुळे लातूरच्या सत्तास्थानी प्रथमच एस.सी. महिला महापौर विराजमान होणार आहे. हा निर्णय सामाजिक समतेच्या दृष्टीने ऐतिहासिक मानला जात आहे.
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. संख्याबळाच्या आधारे लातूर महानगरपालिकेचा पुढील महापौर काँग्रेस पक्षाचाच असणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षातील एस.सी. महिला नगरसेविकांपैकी कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसकडे सध्या तीन अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला नगरसेविका आहेत. त्यामध्ये
१) कांचन अंजनीकर
२) जयश्री सोनकांबळे
३) मनीषा बसपुरे
या तिघींच्या नावांची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तिघीही अनुभवी, सक्रिय आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्याने अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार आहे.
महापौर पद एस.सी. महिलेसाठी राखीव झाल्याने लातूर शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होणार असून, सामाजिक न्याय व प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. आता काँग्रेसकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments