वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
किन्हवली प्रतिनिधी- बाळकृष्ण सोनावणे
मुगाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुगाव येथे बालिकादिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. माधवी विशे उपस्थित होत्या.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. दशरथ विशे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. संदीप विशे तसेच सदस्या सौ. अरुणा विशे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी थोर समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन इयत्ता ७ वीतील शिष्यवृत्तीधारक व यावर्षी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कु. ईश्वरी रमेश विशे हिच्या हस्ते करण्यात आले.
बालिकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कार्यक्रमात निबंध लेखन, वक्तृत्व, कविता वाचन तसेच ऑनलाईन प्रश्नमंजुषा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. मयुरी धानके व कु. लावण्या विशे या विद्यार्थिनींनी केले. त्यामुळे विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासात व नेतृत्वगुणात वाढ झाल्याचे दिसून आले.
या उपक्रमांसाठी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. संजय विशे सर, सौ. रेखा पाटील मॅडम, श्री. रामदास बांगर सर, श्री. किशोर शेलवले सर व श्री. शिवाजी खारतोडे सर यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान बालिकांच्या सशक्तीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अत्यंत मोठे आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची फोटोग्राफी इयत्ता ४ थीतील विद्यार्थी कु. देवदास विशे याने केली, तर हार व फोटो डेकोरेशनचे काम इयत्ता ६ वी व ७ वीच्या विद्यार्थिनींनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment
0 Comments