वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
सहकार्यकारी संपादक - मनोहर गायकवाड
मुंबई/ग्वालियर:
मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची जाळपोळ करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. काही समाजकंटकांनी अनिल मिश्रा व त्याच्या साथीदारांसह हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात येत असून, या घटनेमुळे आंबेडकरी विचारधारेच्या अनुयायांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा दिला आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रतिमेचा अपमान म्हणजे संविधान, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा अपमान आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज, शनिवार दिनांक, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST), फोर्ट येथे दुपारी ठीक १:३० वाजता सामूहिक आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. या आंदोलनाद्वारे बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
“देश मनुस्मृतीने नव्हे, तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालतो. संविधानविरोधी आणि मनुवादी प्रवृत्तींचा आम्ही एकत्र येऊन रस्त्यावर उतरून विरोध करू,” असेही बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments