वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : शंकर गायकवाड
कसारा (ग्रामीण) : कसारा परिसरातील टपरीधारकांवर मोठे संकट ओढावले असून कसारा नगरी उद्ध्वस्त होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. दिनांक ०६ जानेवारी २०२६ रोजी रेल्वे संपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसारा येथील टपरीधारकांच्या दुकानांची कागदपत्रे जमा करून चौकशी केली. तसेच दुकानांवर कारवाईसंदर्भात विचारपूस केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या वेळी कसारा गावाचे सरपंच प्रकाश वीर, उपसरपंच शरद वेडेकर, पोलीस पाटील अशोक कडंक, रघुनाथ कदम, आप्पा बंडुकडे, प्रशांत मोरे (ग्रामपंचायत सदस्य), गोरख उबाळे सदस्य, नारायण पेडकर सदस्य तसेच अनेक व्यापारी उपस्थित होते. कसारा टपरीधारक संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनासमोर बाजू मांडण्यात आली. टपरीधारकांनी आपल्या हक्कांची मागणी करत ग्रामपंचायतीमार्फत लेखी निवेदनही सादर केले.
कसारा परिसरात सुमारे ३५ ते ४५ गावांचा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून येथे सुमारे १३३ दुकाने उभी आहेत. ही बाजारपेठ उद्ध्वस्त झाल्यास हजारो नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाळा व सणासुदीच्या काळात या बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
टपरीधारकांनी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार नोटिसा बजावल्या जात असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. “आमच्या दुकानांवरच आमचा घरसंसार, मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आता अचानक नोटिसा आल्याने आम्ही हवालदिल झालो आहोत,” अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
या कारवाईमुळे भविष्यात कसारा बाजारपेठेचे मोठे नुकसान होऊ शकते, तसेच शेकडो कुटुंबे रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून विचार करून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व टपरीधारकांकडून होत आहे.


Post a Comment
0 Comments