उल्हासनगर | प्रतिनिधी-शंकर गायकवाड
उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार एन्ट्री घेतली असून, सुभाष टेकडी परिसरात पार पडलेल्या भव्य जाहीर सभेने राजकीय वातावरण तापवले आहे. युवा नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या आक्रमक भाषणामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
सभास्थळी उसळलेल्या प्रचंड जनसमुदायाने परिवर्तनाची नांदी स्पष्ट केली असून, जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
“आता भ्रष्टाचाऱ्यांचा हिशोब चुकता होणार!”
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले,
“उल्हासनगरचा विकास निधी वर्षानुवर्षे लुटला गेला. सुभाष टेकडीसह अनेक भागांची अवस्था बिकट झाली आहे. जनतेच्या पैशावर सत्ताधाऱ्यांनी ऐश केली. आता या भ्रष्ट लोकांना सत्तेबाहेर फेकण्याची वेळ आली आहे.”
वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा – विकासाचा ठोस रोडमॅप
वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास उल्हासनगरसाठी पुढील महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली—
प्रत्येक घराला २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा
अंतर्गत रस्त्यांचे संपूर्ण काँक्रिटीकरण
भुयारी गटार योजना राबवून डेंग्यू, मलेरियावर नियंत्रण
पालिकेच्या शाळांतून ‘केजी ते पीजी’ मोफत, दर्जेदार इंग्रजी शिक्षण
घरकुल घोटाळ्याची चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे
“नकली आंबेडकरवाद्यांपासून सावध रहा”
विरोधकांवर घणाघाती टीका करताना ते म्हणाले,
![]() |
| उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेला जनसागराचा प्रतिसाद. |
“आज काही लोक बाबासाहेबांचे नाव घेतात, पण त्यांची पाकीटं ‘कमळाबाई’कडून भरली जातात. असे नकली आंबेडकरवादी तुमची दिशाभूल करतील. ही लढाई सत्तेची नाही, तर तुमच्या भवितव्याची आहे.”
“५०० रुपयांत मत विकणे म्हणजे ३५ पैशांत भविष्य विकणे”
निवडणुकीतील पैशाच्या राजकारणावर भाष्य करताना सुजात आंबेडकर म्हणाले,
“५०० रुपये घेऊन मत विकणे म्हणजे दिवसाला फक्त ३५ पैशांत स्वतःचे भविष्य विकण्यासारखे आहे. एका बाजूला ५० खोके घेणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला १ कोटींची लाच नाकारून सत्यासाठी उभ्या राहणाऱ्या विजयाबाई सूर्यवंशी यांचा आदर्श आहे. निवड तुमची आहे!”
“वंचितांची सभा रोखण्याची ताकद कुणात नाही”
सभेला परवानगी नाकारण्याचे व अडथळे आणण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप करत ते ठामपणे म्हणाले,
“वंचित बहुजन आघाडीची सभा रोखण्याची ताकद महाराष्ट्रात कुणाकडेही नाही. हा आमचा बालेकिल्ला आहे आणि जनता आता योग्य उत्तर देईल.”
या सभेला वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक उमेदवार, पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या जाहीर सभेनंतर उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.



Post a Comment
0 Comments