वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : मोहन दिपके
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पोलीस पाटील पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळ https://hingolipp.recruitonline.in वर राबविण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 26 जानेवारी 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, तर मागास प्रवर्गासाठी 800 रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.
या पदासाठी उमेदवार किमान इयत्ता 10 वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक असून संबंधित गावाचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी वय व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. जाहिरातीनुसार इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे.
पात्र व अपात्र उमेदवारांची छाननी करून यादी 29 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना 1 फेब्रुवारी 2026 पासून प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असून ते संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे.
प्रथम उत्तरतालिका 8 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, प्रश्नपत्रिका व उत्तरतालिकेबाबत लेखी आक्षेप व हरकती सादर करण्यासाठी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून हरकती सादर कराव्या लागणार आहेत. अंतिम उत्तरतालिका 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याच दिवशी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
कागदपत्र तपासणी व मुलाखती 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पोलीस पाटील भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
प्रस्तुत पदासाठी केवळ विहित संकेतस्थळावरून, विहित पद्धतीने भरलेले व निर्धारित शुल्कासह अर्जच ग्राह्य धरले जाणार असून इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी संकेतस्थळास भेट देऊन अद्ययावत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


Post a Comment
0 Comments