वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी - शंकर गायकवाड
ठाणे, दि. १८ – राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि ग्रामपातळीवर व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने सेलिब्रिटी गावभेटींचे आयोजन करण्यात आले.
या अभियानाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध अभिनेत्री शिवाली परब व अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध गावांना भेटी दिल्या. त्यानुसार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील डोहळे, शहापूर तालुक्यातील भावसे–खोस्ते तसेच मुरबाड तालुक्यातील खेवारे येथे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी अभिनेत्री शिवाली परब यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी माध्यम असून, प्रत्येक ग्रामस्थाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. स्पर्धात्मक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानात सहभागी होऊन गावांनी बक्षिसे मिळवावीत, असे आवाहन त्यांनी केले.
अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजना गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे आहे. अधिकारी व कर्मचारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले गाव समृद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सहभागी होऊन समृद्ध गावनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास आमदार दौलत भिका दरोडा, जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष (आप्पा) घरत, उल्हासभाऊ बांगर, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल घरत, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंडित राठोड, गटविकास अधिकारी गोविंद खामकर (भिवंडी), बी. एच. राठोड (शहापूर), लता गायकवाड (मुरबाड), राज्य समन्वयक यास्मिन शेख, ग्रामविकास अधिकारी, सरपंच तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
डोहळे (भिवंडी)
डोहळे ग्रुप ग्रामपंचायतीत जिल्हा परिषद शाळेतील परसबाग व विकसित बागेची पाहणी करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुलांचा गृहप्रवेश पार पडला. तसेच ग्रामस्थांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध वस्तू, भाजीपाला व रानमेव्याचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या विकासकामांची चित्रफीत सादर करण्यात आली.
भावसे–खोस्ते (शहापूर)
ग्रामपंचायत समाजहॉल येथे मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. महिला बचत गटांच्या वतीने सेंद्रीय कडधान्यांचे पॉकेट व वृक्ष भेट देण्यात आले. आदिवासी गौत्या नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. डिजिटल शाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलतारा, शोषखड्डा, सिंचन विहीर व मोगरा लागवड प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.
खेवारे (मुरबाड)
केंद्रशाळा खेवारे येथे डिजिटल शाळेचे उद्घाटन करण्यात आले. गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महिला प्रेरणा संघाच्या सामूहिक परसबाग प्रकल्पास भेट देण्यात आली. डास निर्मूलन उपक्रम व अनिष्ट रूढी निर्मूलन फलकाचे उद्घाटन करण्यात आले. श्रमदानातून जलतारा व वृक्षारोपण कार्यक्रम राबवून ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यात आला.



Post a Comment
0 Comments