वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
प्रतिनिधी : मनोहर गायकवाड
कल्याण : कल्याण परिसरातील पवित्र श्री मलंगगडावर जाणाऱ्या भाविकांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी आहे. देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा अखेर सुरू करण्यात आली असून, या सेवेचे लोकार्पण रविवारी भाजप आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. आजपासून सुरू झालेल्या या सेवेने मलंगगडावर जाणे आता अधिक सोपे, सुरक्षित आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे, भाविकांसाठी ही सेवा पहिल्या दोन दिवसांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत भाविकांना सुमारे २६०० पायऱ्या चढून गडावर जावे लागत होते, ज्यासाठी जवळपास दोन तासांचा कालावधी लागत असे. मात्र फ्युनिक्युलर सेवा सुरू झाल्याने हे अंतर आता अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार आहे.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सन २००४ मध्ये आमदार किसन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. मात्र विविध कारणांमुळे हा प्रकल्प दीर्घकाळ रखडला. २०१२ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, परंतु विधानसभा क्षेत्र विभाजनानंतर पुन्हा अडथळे निर्माण झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाला गती मिळाली आणि अखेर २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.
या फ्युनिक्युलर सेवेमध्ये एकावेळी १२० भाविक प्रवास करू शकतात. संपूर्ण यंत्रणेच्या सुरक्षित आणि सुरळीत कार्यासाठी ७० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वृद्ध, महिला तसेच लहान मुलांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, मलंगगडावरील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे लोकार्पण सोहळ्याला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचे खासदार व पदाधिकारीही या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


Post a Comment
0 Comments