प्रतिनिधी-आनंदा भालेराव
मुंबई, दि. १२ फेब्रुवारी २०२६ — हिंद मजदूर सभा आणि अन्य सी.टी.यू. संघटनांच्या देशव्यापी हडतालला नैतिक समर्थन देण्यासाठी ARIF मुख्यालय, दिल्ली यांच्या आवाहनानुसार आज दुपारी ३.०० वाजता माटुंगा वर्कशॉप (मुख्य प्रबंधक कार्यालय) येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मध्य रेल्वे व कोकण रेल्वेचे महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी दहा सूत्री मागण्यांसह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनआरएमयू मुख्यालयाकडून कार्यकारी अध्यक्ष कॉ. रसीक मलबारी, सहायक महामंत्री कॉ. विवेक नायर, कॉ. पी. जे. शिंदे, कॉ. संतोष कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई मंडळातील सर्व शाखांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कामगार यावेळी सहभागी झाले होते.
कॉ. वेणु पी. नायर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सरकारवर कडक शब्दांत टीका करत कामगारांचे हक्क अबाधित ठेवण्याची मागणी केली. “कामगारांचे अधिकार संपवू नका. देशात जेव्हा जेव्हा कामगार क्रांती झाली, तेव्हा तेव्हा सरकार बदलले आहे. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी “दुनिया के मजदूर एक हो”, “अभी तो यह अंगड़ाई है, बाकी और लड़ाई है”, “एनआरएमयू जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांनी एकजूट दर्शवत हल्लाबोल केला.
या आंदोलनामुळे माटुंगा वर्कशॉप परिसरात काही काळ उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



Post a Comment
0 Comments