प्रतिनिधी-शंकर गायकवाड
लातूर : जवाहर नवोदय विद्यालय, औसा येथील सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवर पालकांनी तीव्र संशय व्यक्त केला असून, आता या लढ्यात वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे.
नेमकी घटना काय?
काही दिवसांपूर्वी विद्यालयाच्या परिसरात अनुष्काचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. शाळा प्रशासनाने ही 'आत्महत्या' असल्याचे प्राथमिक दर्शनी भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुष्काचे वय, तिची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पालकांनी आणि ग्रामस्थांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अंजलीताई आंबेडकरांची भेट
आज वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी पीडित पाटोळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली.
या भेटीनंतर वंचित समूहातील मुलांच्या बाबतीत प्रशासन नेहमीच उदासीन का असते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच शाळा प्रशासन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
अंजलीताई आंबेडकर यांनी अनुष्काच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
"जोपर्यंत अनुष्का पाटोळेला न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. असे अंजलीताई आंबेडकर यावेळी म्हणाल्या.
या प्रकरणामुळे निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता पोलीस प्रशासन आणि शासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांत्वनपर भेटीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, युवा आघाडी राज्य सदस्य तथा नगरसेवक गटनेता अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, सुजाता अजनिक पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments