वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर शहरातील गजबजलेल्या निराला बाजार परिसरात रविवारी सायंकाळी फिल्मी स्टाईलने सशस्त्र लूटपाट झाल्याची धक्कादायक घटना घडली. पानटपरीवर आलेल्या चार जणांनी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवत टपरीचालकाकडून रोख रक्कम व सिगारेट्स लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी अचानक पानटपरीवर धडक देत टपरीचालकाला धमकावले. पिस्तुल रोखून सुमारे ५ ते ७ हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे ६ हजार रुपयांच्या सिगारेट्स त्यांनी जबरदस्तीने घेतल्या. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम राबवून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या *आरोपींमध्ये जय भंडारकर (वय २३), रितेश पहाडिये (वय २५) आणि करण तांडले (वय २६) यांचा समावेश आहे.* आरोपींकडून पिस्तुल, चाकू व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणातील चौथा आरोपी *साहिल चंदक (वय २८)* अद्याप फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. या घटनेप्रकरणी संबंधित आरोपींवर भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
निराला बाजारसारख्या वर्दळीच्या परिसरात सशस्त्र लूटपाटीची घटना घडल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Post a Comment
0 Comments