Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्णच राहिले; सरावादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू


कार्यकारी संपादक : रितेश साबळे

पैठण तालुक्यातील राहटगाव परिसरात पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सुशांत संतोष भोजने (वय २०, रा. वरुडी, ता. पैठण) असे मृत तरुणाचे नाव असून तो गेल्या काही महिन्यांपासून पोलीस भरतीसाठी कठोर सराव करत होता.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुशांत नेहमीप्रमाणे पैठण-पाचोड रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला; परंतु काहीही माहिती न मिळाल्याने पाचोड पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.


दरम्यान, मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारातील मोसंबी बागेजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता तो मृतदेह सुशांत भोजने याचाच असल्याचे नातेवाईकांनी ओळख पटवली. प्राथमिक तपासात सराव करत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस भरतीची स्वप्ने बाळगणाऱ्या एका होतकरू तरुणाचा जीव अशा दुर्दैवी प्रकारात गमावला गेला. सुशांत हा कुटुंबातील जबाबदार मुलगा होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


पाचोड पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक तपासाच्या आधारे वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




Post a Comment

0 Comments