Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

नागपूरमध्ये आरएसएस मुख्यालयावर विशाल महामोर्चा; देशभरातून लाखो कार्यकर्त्यांची उपस्थिती

 


नागपूर, वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज : मोहन दिपके 

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर विशाल महामोर्चा काढण्यात आला. इंदौरा मैदानातून या मोर्चाची सुरुवात झाली. देशातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग घेतला. मोर्चाचे नेतृत्व वामन मेश्राम व चौधरी विकास पटेल यांनी केले.


मोर्चात भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बामसेफ, मूलनिवासी महिला संघ तसेच राष्ट्रीय सिख मोर्चा आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशातील 31 राज्यांमधून, 700 जिल्ह्यांमधून व हजारो गावांतून कार्यकर्ते नागपूरमध्ये दाखल झाल्याचा दावा आयोजकांनी केला.


घोषणाबाजीने परिसर दणाणला

मोर्चादरम्यान आरएसएस व केंद्रातील भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संविधानिक हक्कांचे संरक्षण, ईव्हीएमबाबत प्रश्न, ओबीसींची जातीनिहाय जनगणना, महिलांवरील अत्याचार थांबवणे, तसेच अल्पसंख्याकांवरील अन्यायाविरोधात विविध घोषणा देण्यात आल्या.


अधिवेशन रद्द केल्याचा आरोप

आयोजकांच्या मते, ओडिशातील कटक येथे आयोजित करण्यात आलेले बामसेफ व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन प्रशासनाने अचानक रद्द केले. सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्यानंतरही अधिवेशनास परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील आरएसएस मुख्यालयावर आंदोलनाचा चौथा टप्पा म्हणून हा महामोर्चा आयोजित करण्यात आल्याचे नेत्यांनी सांगितले.


संविधान व हक्कांसाठी लढा

विविध राज्यांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाने दिलेले अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी केली. ओबीसी, एससी, एसटी व अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी जनजागृती सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी होत असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.


पोलिस बंदोबस्त

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


दरम्यान, या आंदोलनाबाबत आरएसएस किंवा भाजपा पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.



Post a Comment

0 Comments