वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कार्यकारी संपादक रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक कीर्तीची ऐतिहासिक वास्तू पानचक्की सध्या दुरवस्थेला सामोरी जात असल्याचे चित्र समोर आले आहे. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाऐवजी आता विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणी सोडले जात असल्याने हौदातील पाणी हिरवेगार झाले असून, त्यामधील माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.
सुमारे ५० बाय ७५ फूट रुंद आणि अंदाजे १२ फूट खोल असलेल्या मुख्य हौदातील पाण्याचा रंग बदलला असून, दुर्गंधी पसरत आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांची संख्या घटत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. पाण्यात वाढलेला कचरा आणि नियमित साफसफाईचा अभाव यामुळे संपूर्ण परिसराच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे.
इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी नोंद झालेली ही वास्तू मलिक अंबर यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी मानली जाते. शहरासाठी पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या नहरीतून अखंड पाण्याचा प्रवाह पानचक्कीपर्यंत पोहोचत असे. उंच भागातून धबधब्यासारखे कोसळणारे पाणी हा स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणून पर्यटकांना आकर्षित करत आले आहे. वर्षभर देश-विदेशातील लाखो पर्यटक येथे भेट देत असतात.
मात्र सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. पानचक्कीच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रशासनाकडून नैसर्गिक पाण्याचा स्रोत सध्या बंद असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंडळाचे अधीक्षक साहील पठाण यांनी विद्युतपंपाच्या सहाय्याने पाणी सोडले जात असल्याची माहिती दिली.
दरम्यान, संरक्षण भिंतींवर वाढलेली झाडेझुडपे, हौदातील कचरा आणि पाण्यात औषधांची फवारणी न होणे यामुळे मासे मृतावस्थेत आढळत असल्याचा आरोप काही जाणकार व्यक्तींनी केला आहे. कार्यालयीन आवारातील दुसऱ्या मोठ्या हौदाचीही स्थिती याहून वेगळी नसल्याचे सांगितले जाते. त्या हौदाखाली वातानुकूलित सभागृह असले तरी वरच्या पाण्यातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचा त्रास वाढत आहे.
साफसफाई आणि देखभालीचे काम कंत्राटी पद्धतीने दिले असले तरी संबंधित कंत्राटदारावर प्रभावी नियंत्रण नसल्याने ही ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित होत असल्याची चर्चा रंगली आहे. वारसा जतनासाठी तत्काळ उपाययोजना करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करावा, अशी मागणी इतिहासप्रेमी व नागरिकांकडून होत आहे.
मुख्य

Post a Comment
0 Comments