वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
संपादकीय : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर — शहरासह मराठवाडा विभागात वाढत्या मादक पदार्थांच्या तस्करी व सेवनाच्या पार्श्वभूमीवर नारकोटिक्स विरोधी टास्क फोर्स (Anti-Narcotics Task Force – ANTF) चे स्वतंत्र कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. ड्रग्ज नेटवर्कवर आघात करून तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन स्थापन करण्यात आलेली ही टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड व धाराशिव या पाच पोलीस घटकांचे कार्यक्षेत्र कव्हर करणार आहे. या माध्यमातून आंतरजिल्हा समन्वय वाढवून ड्रग्ज तस्करीच्या साखळीवर प्रभावी कारवाई करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
या टास्क फोर्सचे नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) साइनाथ ठोंब्रे यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली
निरीक्षक गीता बागवडे,
दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक,
दोन पोलीस उपनिरीक्षक
आणि 18 पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
टास्क फोर्सचे प्रमुख उद्दिष्ट ड्रग्ज तस्करीचे मार्ग शोधून त्यावर कारवाई करणे, मादक पदार्थ पुरवठा करणाऱ्या टोळ्यांची ओळख पटवणे, अचानक छापेमारी करून गुन्हेगारांवर कठोर पावले उचलणे तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून माहिती संकलन मजबूत करणे हे आहे. यासोबतच शाळा, महाविद्यालये व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नशामुक्तीविषयक जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे.
अलीकडच्या काळात औद्योगिक परिसर, ग्रामीण भाग तसेच शहरी भागात ड्रग्ज संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली ANTF ही यंत्रणा ड्रग्ज विरोधातील लढ्यात निर्णायक ठरेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


Post a Comment
0 Comments