![]() |
| बारावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना १८ वर्षीय सोहम कठरे या विद्यार्थ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. |
वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
ठाणे | संपादकीय
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. परीक्षेला जात असताना १८ वर्षीय सोहम कठरे या विद्यार्थ्याचा लोकल रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मुंब्रा–कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीतून तो खाली पडल्याची घटना मंगळवारी सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
सोहम हा डोंबिवली येथे आई-वडिलांसोबत राहत होता. तो कळव्यातील न्यू कळवा हायस्कूलमध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालय येथे होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो डोंबिवलीहून लोकलने परीक्षेसाठी निघाला होता. मात्र गाडीत प्रचंड गर्दी असल्याने दरवाज्यात उभे राहून प्रवास करताना मुंब्रा–कळवा दरम्यान खारेगाव फाटकाजवळ त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत लोहमार्ग पोलिसांना कळवले. गंभीर जखमी अवस्थेतील सोहमला तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र सकाळी १०.३० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लोकलमधील वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोहमच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच शाळा प्रशासनही रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निवेदन देणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


Post a Comment
0 Comments