Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा

 

वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज

कार्यकारी संपादक : रितेश साबळे

औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रांजणगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.


यावेळी सुजात आंबेडकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून स्थानिक विकासाचा सविस्तर आराखडा मांडला. गावागावातील मूलभूत प्रश्न, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी आणि त्यावर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर त्यांनी सखोल भूमिका मांडली. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करून दाखवले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक गावात दर्जेदार प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी, मजबूत रस्ते, स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी, तसेच जिल्हा परिषद शाळांची पुनर्बांधणी करून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण सुविधा देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचेही त्यांनी सांगितले.


“आता केवळ पाहणारे न राहता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आपल्या हक्कासाठी, आपल्या गावाच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी द्या आणि खऱ्या अर्थाने काम करणारे प्रतिनिधी निवडून आणा,” असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी नागरिकांना केले.


या जाहीर सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, औरंगाबाद पश्चिम जिल्हा निरीक्षक योगेश बन, जावेद कुरैशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.



Post a Comment

0 Comments