शहापूर, दि. ८ फेब्रुवारी : शंकर गायकवाड
शहापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग (ICU) तातडीने सुरू करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवसेना शहर शाखा प्रमुख शहापूर विजय रामचंद्र देशमुख यांनी आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे येथील उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहापूर तालुक्यातील हजारो नागरिकांसाठी उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव शासकीय आरोग्य केंद्र आहे. तसेच मुंबई–आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग, रेल्वे मार्ग, वाडीसह अनेक धोकादायक मार्ग या तालुक्यातून जात असल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मात्र रुग्णालयात ICU सुविधा उपलब्ध नसल्यामुळे गंभीर आजार, अपघातग्रस्त रुग्ण, हृदयविकार, श्वसनविकार, सर्पदंश, अतिसार, प्रसूतीसंबंधी गुंतागुंत आदी रुग्णांना तातडीची उपचारसेवा मिळू शकत नाही.
ICU अभावी रुग्णांना ठाणे, कल्याण, नाशिक किंवा मुंबई येथे हलवावे लागत असून त्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होतो. याचा आर्थिक व मानसिक त्रास नातेवाईकांना सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात साथीचे आजार आणि महामार्गावरील अपघात वाढत असल्याने ही अडचण अधिक तीव्रतेने जाणवते.
या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात किमान २०० खाटांचे सुसज्ज ICU तातडीने सुरू करण्यात यावे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या गंभीर बाबीकडे आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment
0 Comments