Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

बोरजा–दुघाळा रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनीला शेतकऱ्यांना मोबदला सरपंच जगदिप दिपके यांच्या पाठपुराव्याला यश; प्रशासनाचा निर्णय

 


हिंगोली (प्रतिनिधी-मोहन दिपके ): हिंगोली जिल्ह्यातील बोरजा फाटा येथून लिगो प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी बोरजा, पिंपळा व दुघाळा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सदर जमिनींचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मोबदला देऊनच रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी वसमत यांनी स्पष्ट केले.


या प्रकरणात एन.डी.एम.जे. संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष तथा दुघाळा गावचे सरपंच जगदिप वसंतराव दिपके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी उपविभागीय अधिकारी वसमत यांची भेट घेऊन रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी विनामोबदला घेण्याचा प्रकार थांबवावा आणि वाढीव क्षेत्राचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.


यानंतर शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी हिंगोली तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मोबदला न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या अध्यक्षतेखाली औंढा (नाग) तहसील कार्यालयात यापूर्वी दोन बैठका पार पडल्या होत्या. या बैठकीत बोरजा, पिंपळा व दुघाळा येथील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला तीव्र विरोध दर्शविला होता.

दरम्यान, दि. १२ मार्च २०२६ रोजी तहसील कार्यालय औंढा (नाग) येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करून नियमाप्रमाणे मोबदला देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.


या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तसेच बोरजा येथील शेतकरी गणेश बळिराम जगताप, पिंपळा येथील बालजी नामदेव कऱ्हाळे, दुघाळा येथील बालासाहेब गणेशराव अगासे, जनार्धन फकिरराव गायकवाड, उपसरपंच विलास उत्तमराव राठोड, ग्रामपंचायत सदस्य सय्यद हयात सय्यद महेबुब, पांडुरंग विठ्ठलराव पोले, कुबेर गोपिचंद पोले आदी उपस्थित होते.


या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व शेतकरी बांधवांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.



Post a Comment

0 Comments