Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

*"कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार" सोहळा संगमनेर येथे संपन्न*

  प्रतिनिधी- तेजस घोसाळे,

  सुजात फाउंडेशन संगमनेर यांच्या वतीने परिवर्तनवादी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ता, कवी, लेखक कालकथित दिनकर साळवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "कवी दिनकर साळवे स्मृती पुरस्कार २०२६" ‘जेष्ठ लेखिका, छत्रपती संभाजीनगर येथील रमाई मासिकाच्या संपादीका व व्याख्यात्या प्रा.डाॅ.रेखाताई मेश्राम यांना जेष्ठ पत्रकार, लेखक व व्याख्याते ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा शनिवार दि.१४ मार्च रोजी सायंकाळी संगमनेर येथील व्यापारी असोसिएशन हाॅल येथे उत्साहात पार पडला.याचवेळी संगमनेर तालुक्याला भूषण वाटावे असे आय.ए.एस.अधिकारी म्हणून ज्यांनी गुणवत्ता संपन्न केली अशा ऋतुजा अशोक गायकवाड व धनंजय दिघे यांचा व महिला दिनी कर्तव्यदक्ष महिला म्हणून पुरस्कारीत झालेल्या कल्पना सूर्यकांत शिंदे यांचाही फौंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

              डॉ.रेखा मेश्राम सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की,समता, स्वातंत्र्य व बंधुता मानणारा आंबेडकरी विचार पुढे नेण्यासाठी रमाई मासिक सातत्याने प्रयत्न करत असून या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी आणखी वाढली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

             कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत ज्ञानेश महाराव आपल्या भाषणात म्हणाले की , समाजपरिवर्तनासाठी साहित्य, पत्रकारिता, आणि सामाजिक चळवळी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे या तिन्ही माध्यमांनी आपली मते घाबरता परखडपणे मांडली पाहिजेत.कर्मकांड आणि भोंदूगिरीपासून समाजाने दूर राहिले पाहिजे.यावेळी त्यांनी दिनकर साळवे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा व साहित्याचा उल्लेख केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ कांदळकर आपल्या भाषणात म्हणाले की, समतेच्या विचाराला बळ देणा-या व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे आहे.तेच काम के.जी.भालेराव आपल्या सुजात फौंडेशनच्या माध्यमातून करत आहेत आणि दिनकर साळवे या परिवर्तनवादी कवीच्या स्मृती जागवत आहे ही संगमनेरकरांसाठी भूषणावह बाब आहे.यावेळी ज्ञानेश महाराव यांच्या सोबत काम करतानाचे अनुभव त्यांनी सांगितले.समाजातील चुकीच्या चालीरीती, परंपरा संपवण्यासाठी साठी महारावांची लेखणी आणि वाणी महाराष्ट्रभर कुणाच्याही दडपणाला न जुमानता चालू आहे.

या कार्यक्रमप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते अजीज ओहरा, छात्र भारती संघटनेचे राज्याचे नेते डॉ.सागर भालेराव, अनिकेत घुले,लोकपंचायतचे जावेद इनामदार, दादासाहेब रोहम फाऊंडेशनचे ऍड.किरण रोहम, बहुजन विकास परिषदेचे किशोर चव्हाण,दै.युवावार्ताचे मुख्य संपादक किसनभाऊ हासे,दै.लोकपरिवर्तनचे संपादक पोपट सोनवणे,आधार फाऊंडेशनचे सुकदेव इल्हे, उज्वल उद्यासाठी त्रैमासिकाचे संपादक प्रा.विठ्ठल शेवाळे,लाॅर्ड बुद्धाचे चॅनलचे डॉ. रविंद्र घोसाळे,प्रा.डाॅ.मिलींद कसबे,रजत अवसक, राजाभाऊ विराट,अनंत पांगारकर,आनंद गायकवाड, सुर्यकांत शिंदे, आनंदराव जमदाडे, दिगंबर वाघमारे, के एस गायकवाड, संदीप वाकचौरे, प्रवीण गवांदे, चंद्रहार मोकळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल पगडाल सर यांनी केले. सूत्रसंचलन संदीप काकड यांनी केले व आभार समीर लामखडे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments